-चोरट्याप्रमाणे येऊन घरासमोर लिंबू फेकून पसार; चिखली पोलिसांत गुन्हा दाखल
चिखली (अंकुश पाटील) : शनिश्चरी अमावस्येच्या रात्रीचा गैरफायदा घेत अघोरी व जादूटोण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या घरासमोर मंत्रलेले लिंबू टाकल्याचा धक्कादायक प्रकार चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा मकरध्वज येथील रहिवासी व पेशाने अभियंता असलेले प्रविण संजय साळवे (वय २९) हे १७ मे २०२६
रोजी सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर गेले होते. सकाळी सुमारे ६:२० वाजता त्यांच्या पत्नी साक्षी साळवे यांनी त्यांना फोन करून घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक पूर्ण व एक कापलेले लिंबू पडलेले असल्याची माहिती दिली. प्रविण साळवे यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता, अंधश्रद्धा किंवा अघोरी कृत्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
यानंतर साळवे यांनी घराबाहेरील CCTV फुटेज तपासले असता, गावातीलच संशयित इसम शेख गणी शेख दादु हा त्यांच्या घरासमोर येऊन लिंबू फेकत असल्याचे स्पष्ट दिसून आले. आरोपी चोरट्याप्रमाणे येऊन काही क्षणांत लिंबू फेकून निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर प्रविण साळवे यांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ ठेंग यांना बोलावून संबंधित फुटेज दाखवले. फुटेजमधील व्यक्ती ही शेख गणी शेख दादु व त्याचा मुलगा शेख अजमत शेख गणी असल्याचे त्यांनी ओळखल्याचे सांगण्यात आले. शनिश्चरी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पूर्ववैमनस्यातून किंवा अघोरी/जादूटोण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपासाला वेग
या प्रकरणामुळे कुटुंबाला मानसिक त्रास झाल्याचे सांगत प्रविण साळवे यांनी त्यांचे मामा दादाराव श्रीराम पडघान यांच्यासह चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्टेशन डायरी क्रमांक २२/२६ अन्वये नोंद केली असून, भारतीय न्याय संहिता तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा अघोरी प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.