-समुदाय आरोग्य अधिकारी सतत गैरहजर; संतप्त ग्रामस्थांचा जनआंदोलनाचा इशारा
लोणार(वाजिद खान) : तालुक्यातील गुंजखेड येथील आरोग्य उपकेंद्रात नियुक्त असलेले समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) सतत गैरहजर राहत असल्याने गावातील आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेलाच या प्रकारामुळे हरताळ फासला जात असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवर तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र गुंजखेड येथे नियुक्त अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे उपकेंद्रातील आरोग्य सेवा जवळपास ठप्प झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर आक्रमक भूमिका घेत अधिकृत तक्रार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात दाखल केली आहे. निवेदनात संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी किंवा बदली करून त्या जागी नियमित व कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर नागवंशी संघपाल पन्हाड, विजय उत्तम पाईक, रवींद्र पाईक, अनिल बबन वाठोरे, समाधान नामदेव सुलताने, गौतम जावळे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.