-लोणार येथे केमिस्ट असोसिएशनकडून तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर
लोणार (वाजिद खान) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनानुसार 20 मे 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या “अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोणार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोणार तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.
या निवेदनात ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल प्रणाली आणि इंटरनेट फार्मसीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या परिणामांविषयी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र शासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्हा आणि लोणार तालुक्यातील सर्व औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अतिआवश्यक रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक ती मदत आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने निवेदन स्वीकारून योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संघटनेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, बंदच्या दिवशी अतिआवश्यक रुग्णसेवेसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.