-महाराणा टायकांडो कराटे अकॅडमीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; राज्य व राष्ट्रस्तरावर सुवर्णपदकांची कमाई
लोणार (वाजिद खान) : महाराणा टायकांडो कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली असून आता त्यांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे लोणार आणि अकोला परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून कठोर सराव आणि मेहनतीच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. राज्यस्तर आणि राष्ट्रस्तरावरील स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवत त्यांनी आपल्या आई-वडिलांसह शाळा, अकॅडमी आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. नेपाळ येथे १५, १६ आणि १७ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत साक्षी नागापूरे, भूमिका सानप, समीक्षा झिने, एकांकुमार राठोड, मेहुल ठाकूर, सोहम जाधव आणि चंचल दाते हे विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष जाधव, कराटे प्रशिक्षिका चंचल दाते तसेच प्रशिक्षक आर्यन वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय लोणारचे महसूल अधिकारी संतोष जाधव, तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमापक उमेश सानप आणि जितेंद्र झिने यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.