-संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; तापमानात घट
लोणार (वाजिद खान) : गेल्या काही दिवसांपासून प्रखर उन्हाने होरपळून निघालेल्या नागरिकांना आज निसर्गाने सुखद दिलासा दिला. संध्याकाळी सुमारे ५:३० वाजता अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत लोणार शहराला अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून कडक उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ ते ४१ अंशांच्या आसपास होता. दुपारच्या वेळेत नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले होते. मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला. तरीही अचानक पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोणार शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये या पावसाने हजेरी लावली. कडक उन्हातून आलेल्या या सरींमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी याचे काही दुष्परिणामही जाणवण्याची शक्यता आहे.
अचानक बदललेल्या वातावरणामुळे बागायतदार आणि व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः आंबा आणि इतर उन्हाळी पिकांवर या पावसाचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय तापमानातील चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.