-मानस मंदिरात ७५ व्या वाढदिवसानिमित्त गौरव; समाजकार्याची दखल
वर्धा (प्रकाश कथले): प्रसिद्ध गुरुदेव प्रचारक व योगशिक्षक शालिग्रामजी वानखेडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा येथील मानस मंदिरात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षक नेते शेषराव बिजवार आणि कामगार नेते प्रकाश येंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वानखेडे यांनी पिपरी ग्रामीण महाविद्यालयात सेवा बजावत असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी योगशिक्षण आत्मसात करून शहरातील विविध भागांमध्ये योग शिबिरे आयोजित केली. त्यांच्या या कार्यातून अनेक युवकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. या प्रसंगी मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना वानखेडे म्हणाले की, “सेवेची भावना ठेवून काम केल्यास उपकाराची भावना राहत नाही. मी जे काही केले ते कर्तव्य म्हणूनच केले,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत बरडे यांनी केले, तर वाडेकर मॅडम यांनी आभार मानले.
चौकट : देणगीची घोषणा
सत्कार प्रसंगी बोलताना शालिग्राम वानखेडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठानसाठी सामाजिक कार्याच्या उद्देशाने ४१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. संस्थेचे पुण्यदासजी चरडे यांनी हा धनादेश स्वीकारला.