– सत्तेच्या चाव्यांसाठी महायुती-‘मविआ’मध्ये राजकीय ‘ओढाताण’!
– बच्चू कडू शिंदे गटासोबत गेले, रविकांत तुपकर काय भूमिका घेणार?
– बच्चू कडू शिंदे गटासोबत गेले, रविकांत तुपकर काय भूमिका घेणार?
नागपूर/ बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्याच्या राजकारणाची सत्तापेजं सोडवणारा विदर्भ २०२६ च्या उंबरठ्यावर राजकीयदृष्ट्या कमालीचा तापला आहे. ६२ विधानसभा मतदारसंघांचे पाठबळ असलेल्या या प्रदेशात वर्चस्व राखण्यासाठी भाजपने ‘गुंतवणुकीचे कार्ड’ टाकले असतानाच, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने सरकारची नाकेबंदी सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये आतापासूनच सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी ‘महायुद्ध’ सुरू झाले आहे. बच्चू कडू यांच्यासारखा नेता शिंदे गटासोबत गेल्याने, त्यांच्या तोडीस तोड असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भाजपसोबत जातील का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या प्रदेशात आता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असलेले बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला विधान परिषदेच्या माध्यमातून ताकद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात शिवसेनेचा विस्तार अधिक आक्रमक केला आहे. भाजपचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२६’ च्या माध्यमातून ४५ हजार कोटींची गुंतवणूक आणून बेरोजगारीचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी विदर्भातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांसारखे नेते अर्थसंकल्पातील तरतुदींवरून सरकारला धारेवर धरत आहेत. मुंबई-पुणे केंद्रित राजकारणामुळे विदर्भ मागे पडत असल्याचा आरोप करत ‘प्रादेशिक समतोल’ हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवला जात आहे.
कळीचे मुद्दे आणि सद्यस्थिती
| मुद्दे | सद्यस्थिती आणि प्रभाव |
| शेतकरी आत्महत्या | २०२६ च्या सुरुवातीलाच १९८७ आत्महत्यांची नोंद झाली असून, हा मुद्दा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. |
| कृषी धोरण | सरकारने ‘AI-driven Agriculture’ धोरण आणले असले, तरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरून शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. |
| स्वतंत्र विदर्भ | हा मुद्दा अधूनमधून चर्चेत येत असला तरी, यंदाच्या निवडणुकीत तो दुय्यम ठरताना दिसत आहे. |
विदर्भातील जागावाटप हा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांसाठी डोकेदुखी ठरणार विषय राहात आला आहे. विशेषतः अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील जुना वाद महायुतीसाठी अडचणीचा ठरू शकतो. नागपूर, अकोला आणि अमरावती या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेत्यांची संभाव्य पक्षांतरे पाहता, उमेदवारी अर्जांच्या वेळी मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात शिरकाव केल्याने भाजपच्या नेत्या व आमदार श्वेताताई महाले पाटील यांची राजकीय कोंडी झाली आहे. चिखलीत आ. गायकवाड व काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सख्य सद्या भाजपसाठी राजकीय चिंतेचा विषय बनला आहे. तसेच, खामगावात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याने तेथे मंत्री आकाश फुंडकर यांचीही शिंदे गटाकडून राजकीय कोंडी केली जात आहे. सिंदखेडराजात शिंदे गटाचे डाॅ. शशिकांत खेडेकर यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी जवळीक साधल्याने महायुतीचे आमदार मनोज कायंदे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणले जात आहे. एकूणच, बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतच सर्वकाही आॅलवेल नसल्याचे दिसून येत आहे.
एकूणच, विदर्भात सद्या तरी, सत्ताधारी पक्षाकडून ‘विकासाची वारी’ आणि विरोधकांकडून ‘अनय्याचा पाढा’ असा टिकेचा सूर आवळला जात असला तरी शिंदे गट व भाजप यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी निर्माण झालेली नवीन राजकीय समिकरणे विदर्भातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश करून आमदारकी पदरात पाडून घेतली. शेतकरीप्रश्नांवरून त्यांनी जोरदार रान माजविले होते. उद्या शेतकरी कर्जमाफीचे सगळे श्रेय त्यांना दिले जाण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत विदर्भातील चाणाक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर हे काय भूमिका घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जमाफीच्या शेतकरी आंदोलनात रविकांत तुपकर हेदेखील बच्चू कडू यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले. तसेच, शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नांवरून तुपकर यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे बच्चू कडू हे शिंदे गटासोबत गेले, आता तुपकर हे भाजपसोबत जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वास्तविक पाहाता, तुपकर यांच्यासारखा अभ्यासू, आक्रमक आणि शेतकरी प्रश्नांचा सखोल अभ्यास असलेला नेता भाजपला हवा आहे, अशी वरिष्ठस्तरीय सूत्रांची खास माहिती आहे. तुपकर हे भाजपसोबत आले तर त्यांना शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळू शकते. कदाचित, पुढील लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे बुलढाण्याचे खासदार राहू शकतात, असेही या वरिष्ठ राजकीय सूत्राचे म्हणणे आहे.