– नियोजनाच्या ‘गळती’मुळे मंगरूळ तहानलेलेच; दोषींवर कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले!
– २०२१ पासून मंजूर योजना कागदावरच; पंचायत समितीसमोर आंदोलनाचे हत्यार!
चिखली (अंकुश पाटील) : ६७ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही प्रशासकीय अनास्था आणि नियोजनशून्य कारभारामुळे चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेचा निषेध करत संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर चिखली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मंगरूळ गावाची तहान भागवण्यासाठी २०२१ मध्ये शासनाने ६७ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. यामध्ये विहीर, पाईपलाईन आणि वीज जोडणी अशा कामांचा समावेश होता. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीपासूनच गोंधळ असल्याचे समोर आले आहे. पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ती चक्क बुडीत क्षेत्रातून नेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, वारंवार होणारी गळती आणि नियोजनाचा अभाव यामुळे लाखो रुपये खर्च होऊनही नळाला पाणी मात्र आलेच नाही.
या योजनेत कंत्राटदार आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींचे संगनमत असून त्यांनी संगनमताने शासकीय निधीचा अपव्यय केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. दोन वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.
पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी न लागल्यास ५ मेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले. “शासकीय पैसा पाण्यात घालवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गावाला तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या उपोषणाने चिखली तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता पंचायत समिती यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.