-विज्ञान व कला शाखेत शतप्रतिशत यश, ८७ विद्यार्थी विशेष प्राविण्य तर १८४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या निकालात यंदाही उज्ज्वल यश संपादन करत सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या बारावीच्या विज्ञान व कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून विज्ञान शाखेतील ८७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, तर १८४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेत एकूण २९१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ८७ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली, तर ९९ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के गुण मिळवून उच्च प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच ५ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८० टक्के गुण मिळवत प्राविण्य श्रेणीत यश संपादन केले. या शाखेत ऊर्वी अनिल कड (९४.७७), सार्थक हरीष सावजी (९४.००), सायली बाजीराव डोंगरदिवे (९३.८३), साक्षी संतोष डहाळे (९३.६७), प्रियल अनंत इंगळे (९३.६७), प्रतिभा गजानन पोपळघाट (९३.३३) आणि पूजा संजय राऊत (९३.१७) यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाचा मान उंचावला. कला शाखेतही १०० टक्के निकाल लागला असून ६८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेत रुपाली पवार (८५.६७) प्रथम, माया हिवाळे (८२.५०) द्वितीय, साक्षी घुबे (८१.१७) तृतीय, वैष्णवी भुसारी (८०.३३) चौथी आणि प्रशांत कुटे (८०.००) पाचवा क्रमांक मिळवत यशस्वी झाले. जानकीदेवी विद्यालयाचा हा नेत्रदीपक निकाल चिखली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट निकाल ठरला असून परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. संस्थाध्यक्ष शेनफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धव घुबे आणि प्राचार्य हरिदास घुबे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांचेही अभिनंदन केले.