– पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; ‘शिवाजी कोण होता?’ वाचन आंदोलनाने राजकीय वातावरण तापले!
– संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात युवक काॅंग्रेसने आ. गायकवाड यांना दिले चोख प्रत्युत्तर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाचे लोण आता रस्त्यावरील संघर्षापर्यंत पोहोचले आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित शिवीगाळ प्रकरणाचे तीव्र पडसाद बुधवारी बुलढाण्यात उमटले. युवक काँग्रेसने पुकारलेल्या सामूहिक पुस्तक वाचन आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आ. गायकवाड यांचे समर्थकही मैदानात उतरल्याने, शिवस्मारक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य राडा टळला.
काही दिवसांपूर्वी आ. संजय गायकवाड यांनी आंबी यांना फोनवरून दिलेल्या धमकीची क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि काँग्रेस नेते संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक संगम चौकातील शिवस्मारकासमोर पुस्तक वाचनाचे नियोजन करण्यात आले होते. मंगळवारी पुरोगामी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आधीच संतापाचे वातावरण होते. बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाचन सुरू करताच गायकवाड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांवर दडपशाहीचा आरोप होत होता. मात्र, बुधवारी पोलिसांनी रणनीती बदलली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी चपळाईने परिस्थिती हाताळली. दोन्ही गटांना पांगवण्यात यश आल्याने हिंसाचार टळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतरही आ. गायकवाड आणि त्यांचे समर्थक भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह संदीपदादा शेळके, अनुराग भोयर, प्रवीण बिरादार, नितेश वानखेडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशासकीय दडपशाही झुगारून हा वैचारिक लढा अधिक तीव्र करण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. तर दुसरीकडे, पुस्तकातील मजकुराला विरोध दर्शवत गायकवाड समर्थकांनीही आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.
“छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास मांडणाऱ्या पुस्तकांवर बंदी आणणे किंवा प्रकाशकांना महिलांविषयी अपशब्द वापरून धमकावणे ही लोकशाहीची हत्या आहे. दडपशाहीला न जुमानता आमचा वैचारिक लढा सुरूच राहील.” — शिवराज मोरे, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस