-लोकाभिमुख नेतृत्व आणि राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अंत
शेवगाव (बाळासाहेब खेडकर): शेवगाव तालुक्याचे बुलंद व्यक्तिमत्त्व आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले स्व. दिलीपराव नरसिंहराव लांडे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
जोहरापूरचे सरपंच म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पंचायत समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अशी विविध महत्त्वाची पदे भूषवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी छाप उमटवत प्रभावी नेतृत्व सिद्ध केले. स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय धडे घेतले. पुढे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि नरेंद्र घुले यांच्या सहवासात कार्य करत त्यांनी आपले नेतृत्व अधिक सक्षम केले. अभ्यासू, धडाडीचे आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली होती.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दररोज “दरबार” भरत असे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे ते जनतेच्या मनात खोलवर रुजले होते आणि “दिलीप भाऊ” या नावाने सर्वत्र परिचित झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना आजारपणाचा त्रास सहन करावा लागत होता. पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. तरीही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम ठेवली होती. विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळूनही त्यांनी ती जाणीवपूर्वक टाळली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. जोहरापूर येथे सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी खासदार निलेश लंके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.