– दाखले वितरणात ९८.२७ टक्के यश; सुट्टीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी राबवले काम!
चिखली (अंकुश पाटील) – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांना विहित मुदतीत सेवा पुरवण्यात चिखली तहसील कार्यालयाने जिल्ह्यात बाजी मारली आहे. तब्बल ९८.२७ टक्के सेवा वेळेत पूर्ण करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लोकसेवा हक्क दिना’चे औचित्य साधून चिखली तहसील प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये चिखली तहसील कार्यालयामार्फत विविध प्रवर्गातील ६५ हजारांहून अधिक दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यात जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रीमी लेयर, शेतकरी दाखला आणि भूमी अभिलेखविषयक सेवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि इतर तातडीच्या कामांसाठी नागरिकांची अडवणूक होऊ नये, यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून सेवा दिली. या कर्तव्यनिष्ठेमुळेच चिखली कार्यालयाला हे यश संपादन करता आले.
प्रशासकीय कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नायब तहसीलदार हरी ज्ञानदेव वीर आणि महसूल सहाय्यक हरिदास थोलबरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख, उपविभागीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श!
“उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण चमूने एकत्रित प्रयत्न केले. नागरिकांना पारदर्शक आणि जलद सेवा मिळणे हा आमचा मुख्य उद्देश होता,” अशी भावना यावेळी प्रशासकीय गोटातून व्यक्त करण्यात आली. लोकसेवा हक्क अधिनियमाच्या मूळ उद्दिष्टांना हरताळ न फासता, चिखली तहसीलने प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात दाखवलेली तत्परता इतर कार्यालयांसाठी दिशादर्शक ठरली आहे.