– विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा हिसका; अखेर नुकसानग्रस्ताला मिळाला न्याय!
– आयोगाचा दणका बसताच नुकसानभरपाईपोटी १० लाखांचा धनादेश सुपूर्द!
चिखली/बुलढाणा (अंकुश पाटील) – विमा हप्ता भरूनही नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका नामवंत विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. शॉर्ट सर्किटमुळे दुकानाचे नुकसान झालेल्या एका व्यावसायिकाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिल्यानंतर, कंपनीने तक्रारदारासोबत तडजोड करत दहा लाखांचा धनादेश सुपूर्द केला.
हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील व्यावसायिक शुभम प्रभाकर अवचार यांचे ‘शुभम टायर्स अँड स्पेअर्स पार्ट’ विक्रीचे दुकान आहे. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी ‘बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स’ कंपनीचा विमा उतरवला होता. यासाठी त्यांनी ३,१४२ रुपयांचा हप्ता भरला होता व त्या बदल्यात १० लाख ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सर्व साहित्य जळून खाक झाले. या नुकसानीनंतर अवचार यांनी विमा कंपनीकडे दाव्याची मागणी केली, मात्र कंपनीने ती फेटाळून लावली.
विमा कंपनीकडून दाद मिळत नसल्याने अवचार यांनी अॅड. गणेश पी. थुट्टे यांच्यामार्फत बुलढाणा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. यात विमा कंपनीने तक्रारदारास १० लाख ५० हजार रुपये, तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ८ टक्के व्याजासह द्यावेत, असा आदेश दिला. तसेच शारीरिक-मानसिक त्रासापोटी ७ हजार आणि तक्रार खर्चापोटी ३ हजार रुपये देण्याचेही निर्देश दिले.
आयोगाच्या या कडक आदेशानंतर विमा कंपनीने हे प्रकरण आपसात मिटवण्याची विनंती केली. तक्रारदाराने ही विनंती मान्य केल्यानंतर, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत १० लाख रुपयांचा धनादेश तक्रारदाराला सुपूर्द करण्यात आला. यावेळी तक्रारदाराचे वकील अॅड. जी. पी. थुट्टे, विमा कंपनीचे वकील अॅड. गवई, अॅड. पांडुरंग सावळे आणि निवृत्ती कोथळकर उपस्थित होते. या प्रकरणात तडजोडीसाठी अॅड. सावळे यांनी विशेष सहकार्य केले.