– प्रशांत आंबींसह शेकडो कार्यकर्ते ताब्यात; ४३ अंश तापमानात आंदोलकांचे हाल; आ. गायकवाड समर्थकांशी हुज्जत!
– चिखलीत नाकाबंदी; प्रकाशक प्रशांत आंबींना भरचौकातून घेतले ताब्यात!
– आ. संजय गायकवाडांचा इशारा: “एकेरी उल्लेख केल्यास गाठ आमच्याशी”
बुलढाणा (बाळू वानखेडे) : प्रसिद्ध विचारवंत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या जाहीर वाचनावरून मंगळवारी बुलढाणा शहरात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर पुस्तक वाचनाचा निर्धार करून आलेल्या पुरोगामी चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून रोखले. आंदोलकांना अक्षरशः फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ऐनवेळी आपला दौरा रद्द केल्याने आंदोलकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते.
आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील उल्लेखांवरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार करणार होते. मात्र, पोलिसांनी सकाळीच प्रकाशक प्रशांत आंबी यांना चिखली येथे स्थानबद्ध केल्याने तणाव वाढला. आंबी यांनी स्थानबद्ध होण्यापूर्वी भर चौकात पुस्तकाचे वाचन करून पोलिसांच्या कारवाईला आव्हान दिले. त्यांना दिवसभर चिखलीतील एका हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येऊन हाॅटेलबाहेर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर राज्यातील २८ जिल्ह्यांतून पुरोगामी चळवळीतील सुमारे ५०० ते १००० कार्यकर्ते जमा झाले होते. कडक उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेलेला असताना, आंदोलकांसाठी उभारलेला मंडप आणि पिण्याच्या पाण्याची सोय अज्ञात दबावाखाली ठेकेदाराने काढून घेतली. रणरणत्या उन्हात महिला आणि तरुण आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. कार्यकर्त्यांनी आ. गायकवाड यांच्या घराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आंदोलकांवर झडप घातली. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत मोनिका नावाच्या आंदोलक तरुणीचा हात दुखावला.
एकीकडे पुरोगामी कार्यकर्ते वाचनावर ठाम असताना, दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांचे समर्थकही मोठ्या संख्येने जमा झाले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने परिस्थिती चिघळली होती. “आम्ही शांततेत पुस्तक वाचन करून नियम पाळू,” असे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन अक्षरशः चिरडून टाकले. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पुन्हा एकदा इशारा दिला की, “वाचनावेळी जर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला गेला आणि शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तर त्याला आयोजकच जबाबदार असतील.” तर, “लोकशाहीत पुस्तक वाचन करणे हा गुन्हा आहे का?” असा प्रश्न कॉ. अजित नवले यांनी उपस्थित केला. या आंदोलनात कॉ. स्मिता पानसरे, शेतकरी नेते अजित नवले, तुकाराम भस्मे, सुभाष लांडे, डॉ. युगल रायलू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत बुलढाणा शहरात तणावपूर्ण शांतता होती.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यापूर्वी बुलढाणा शहर पोलिसांनी प्रशांत आंबी यांना नोटीस बजावत आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण करू नये, जात-धर्मावरून वक्तव्य करू नये तसेच कोणाच्याही भावना दुखावतील अशी भाषा टाळावी, अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही नोटिशीत देण्यात आला होता.