-सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर प्रशासनाची तत्काळ कारवाई; स्वच्छतेसाठी जनजागृतीची गरज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्र आळंदी येथील बाह्यवळण मार्गावर साचलेल्या कचऱ्याचे साम्राज्य हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अखेर मोहीम हाती घेतली आहे. अस्वच्छतेबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत दुतर्फा स्वच्छतेचे काम सुरू केले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा उचलण्याची मोहीम राबवली. साचलेला कचरा संकलित करून ट्रॅक्टर व ट्रकद्वारे पुढील विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नागरिक व भाविकांना कचरा घंटागाडीतच देण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. आळंदी लगतच्या केळगाव व चऱ्होली खुर्द परिसरातील काही नागरिक बाह्यवळण मार्गावर कचरा टाकत असल्याची तक्रार असून, यामुळे मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली होती. यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी चऱ्होली खुर्द, केळगाव व आळंदी परिसरात प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.