-सीसीटीव्हीत संशयितांचे अस्पष्ट चित्रण; फॉरेन्सिक तपास सुरू, आरोपी लवकरच जेरबंद होण्याची शक्यता
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यातील वर्दडी बु. येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सलग पाच दुकानांचे शटर उचकटून सुमारे ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. फिर्यादी सुनिल हरीभाऊ आटोळे (रा. वर्दडी बु.) यांच्या तक्रारीनुसार १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ते १६ एप्रिल रोजी पहाटे २.४५ वाजेदरम्यान ही घटना घडली. आटोळे यांच्या ‘आराध्या मेडिकल जनरल स्टोअर्स’सह परिसरातील इतर दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड चोरी केली.
या घटनेत आराध्या मेडिकलमधून १४ हजार रुपये, पूजा किराणा स्टोअर्समधून २२ हजार रुपये व सुमारे ३ हजार रुपयांचे नुकसान, बालाजी जनरल स्टोअर्समधून १५ हजार रुपये, जय गजानन पाणीपुरी सेंटरमधून १० हजार रुपये तर श्री मेडिकलचे शटर तोडून नुकसान करण्यात आले. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयितांची हालचाल कैद झाली असली तरी चित्रण अस्पष्ट असल्याने आरोपींची स्पष्ट ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या फुटेजचे बारकाईने विश्लेषण सुरू केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिंगरप्रिंट ब्युरो, बुलढाणा तसेच देऊळगाव राजा येथील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास काकड करीत आहेत. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.