-वाकडेवाडी बसस्थानकावरून चोरी; तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
बाळासाहेब खेडकर () : नेवासे तालुक्यातील करजगाव येथील मीनाबाई ज्ञानदेव बडाख यांच्यासोबत घडलेल्या चोरीप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे. अवघ्या काही दिवसांत सुमारे २५ लाख रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ७ एप्रिल रोजी पुण्यातील वाकडेवाडी एसटी स्थानकावरून गावी निघालेल्या बडाख यांच्या बॅगेतील दागिने प्रवासादरम्यान चोरीस गेले होते. घोडनदी-शिरूरदरम्यान बसमध्ये चढलेल्या दोन महिलांपैकी एकीने त्यांच्या शेजारी बसून चलाखीने दागिने लंपास केले. केडगाव येथे पोहोचल्यावर बॅग तपासली असता दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माया कल्याण भोसले (रा. हातगाव, ता. शेवगाव) हिला अटक केली. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली देत दागिने बोधेगाव येथील एका सराफाला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सराफाला नोटीस बजावून ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही सराफांचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. १६ एप्रिल रोजी एका सराफ व त्याच्या साथीदारांनी पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. संबंधितांवर कडक कारवाईची तयारी सुरू असून सहआरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.