सरकारच ‘बाबां’च्या पाठीशी, मग कायदा राबवणार कोण? खरात प्रकरणावरून श्याम मानवांनी काढले सरकारचे वाभाडे!
नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – येथील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याला लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी विद्यमान सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. जादूटोणाविरोधी कायदा राबवण्याची विद्यमान सरकारची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुळीच इच्छा नाही, असा थेट आरोप त्यांनी केला.
अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ वेळा तर रुपाली चाकणकर यांनी १७७ वेळा कॉल केले आहेत. या सर्व बाबींची स्पष्टता होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, शाम मानव यांनी ‘बाबा’ संस्कृतीवर भाष्य करताना सांगितले की, समाजात ‘भोंदू बाबा’ असा कोणताही स्वतंत्र प्रकार नसतो. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगणारे सर्वच बाबा मुळात भोंदू आणि खोटारडे असतात. १९८२ पासून या क्षेत्रात काम करताना आपण शेकडो असे बाबा पाहिले आहेत जे धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा उपभोग घेतात. सध्याच्या काळात असा एकही बाबा नाही जो स्त्रियांचे शोषण करत नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
खरात प्रकरणाचे कायदेशीर विश्लेषण करताना शाम मानव यांनी माजी महिला आयोग अध्यक्षांनाही इशारा दिला आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार केवळ गुन्हा करणेच नव्हे, तर अशा कृत्यांचा प्रसार करणे हा देखील गुन्हा ठरतो. जर रुपाली चाकणकर यांनी खरातला आपले गुरू मानून इतर स्त्रियांना त्याच्याकडे नेले असेल आणि तिथे प्रभाव निर्माण केला असेल, तर त्यांनाही कायद्यानुसार समान शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद त्यांनी निदर्शनास आणून दिली. खरातने पोलिसांना दिलेल्या जबाबाचा संदर्भ देताना मानव म्हणाले की, त्याने कोणत्याही स्त्रीवर जबरदस्ती केली नसल्याचा दावा खरा असू शकतो, कारण अशा बाबांकडून तसा मानसिक आभास निर्माण केला जातो की त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास संबंधित महिलेचे कल्याण होईल.
या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शाम मानव म्हणाले की, जेव्हा संपूर्ण सरकारच अशा बाबांच्या पाठीशी असते, त्यांचे दौरे आखते आणि त्यांना संरक्षण देते, तेव्हा सरकारी अधिकारी कायदे राबवण्यास टाळाटाळ करतात. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सध्याच्या सरकारची उदासीनता स्पष्ट दिसत आहे. मात्र, अशोक खरातचे हे प्रकरण बाहेर आले याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यातील सहभाग हेच आहे. जर त्यांचा सहभाग नसता, तर कदाचित हे प्रकरण कधीच दडपले गेले असते, असा दावाही त्यांनी केला. सध्या या प्रकरणासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली असून, पोलीस या तपासात कोणती भूमिका घेतात, यावर आपले बारीक लक्ष असल्याचे मानव यांनी स्पष्ट केले आहे.