-सर्वाधिक मदत नांदेड जिल्ह्यात; बुलढाणा जिल्ह्यास ५६४.९८ कोटींचा लाभ
साखरखेर्डा ( अशोक इंगळे ) : पुणे : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासाठी पीकविमा योजनेतून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश असून कापूस व तूर पिकांची नुकसानभरपाई दुसऱ्या टप्प्यात येत्या काही दिवसांत देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण मदतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली असून बुलढाणा जिल्ह्यास ५६४.९८ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल ९८ लाख ४३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते.
पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी सुमारे १७ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ही नुकसानभरपाई पीक कापणी प्रयोगांवर आधारित असून राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील उत्पादनाची सरासरी काढून माहिती विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी साडेसात हजार मंडळांची माहिती अंतिम करण्यात आली असून केंद्र सरकार व विमा कंपन्यांच्या मंजुरीनंतर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित मंडळांची माहिती लवकरच पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील मदत जाहीर होणार आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील सुमारे ७८ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश असून राज्यात सुमारे ५८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड झाली होती, त्यापैकी सुमारे ३५ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. त्यामुळे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.