तहसीलदारांना निवेदन; धूळ, प्रदूषण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थ आक्रमक
बुलढाणा (आकाश पाटील) : तालुक्यातील दत्तपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अफजलपूर-तांडा परिसरातील अवैध स्टोनक्रशर आणि खनिपट्ट्यांमुळे ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, अखेर संतप्त गावकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हे स्टोनक्रशर बंद न झाल्यास आणि नवीन क्रशरला परवानगी नाकारली नाही, तर संपूर्ण गाव सामूहिक आत्मदहन करेल, असा इशारा गावकऱ्यांनी तहसीलदार श्री. कुमरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अफजलपूर-तांडा गावालगत सुरू असलेल्या स्टोनक्रशरसाठी होणाऱ्या अवजड टिप्परच्या वाहतुकीमुळे अफजलपूर-देऊळघाट आणि दत्तपूर-अफजलपूर या रस्त्यांची पूर्णतः दैना झाली आहे. विशेष म्हणजे, शासनाने अडीच कोटी रुपये खर्च करून नुकताच अफजलपूर-देऊळघाट रस्ता तयार केला होता. मात्र, या अवैध वाहतुकीमुळे हा रस्ता आता उखडला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असून, अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
स्टोनक्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. पिकांवर धुळीचे थर साचल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, सततच्या उत्खननामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली असून, पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
वस्तीला धोका, प्रशासन ढिम्म?
सदर स्टोनक्रशर मानवी वस्तीपासून केवळ २०० मीटर अंतरावर असल्याने त्याचा गावकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. क्रशरच्या धक्क्यांमुळे घरांना तडे गेले असून, घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे अस्तित्वात असलेल्या क्रशरमुळे गावकरी त्रस्त असताना, दुसरीकडे याच परिसरात नवीन खनिपट्ट्यांना परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गावकऱ्यांनी आज तहसीलदारांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. “आम्ही अनेकदा तक्रारी केल्या, पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर २७ एप्रिल २०२६ रोजी आम्ही गावातच सामूहिक आत्मदहन करू,” असा पवित्रा अफजलपूर-तांडा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.