-संत भगवानबाबांच्या परंपरेतील सप्ताह; ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन
बडेवाडी (बाळासाहेब खेडकर) : ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबांनी प्रारंभ केलेला ९२ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी बडेवाडी येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्त श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी विशेष लेख लिहिला आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचा ९२ वा नारळी सप्ताह
संत महापुरुषांचे एकत्रीकरण म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विचारांची देवाणघेवाण, तत्त्वज्ञानावर चर्चासत्र, अनेक महापुरुषांना अभिप्राय व्यक्त करण्याचे व्यासपीठ या सप्ताहातून उपलब्ध होते. सामान्यांचे एकत्रीकरण, एकत्र जेवण, निर्व्यसनीपणाचे प्रशिक्षण, जीवनाविषयी गंभीरता, ईश्वराविषयी प्रेम, जीवन आणि संसाराची अनित्यता, सुख-दुःखाची जाण, स्वतःविषयीचे ज्ञान व जगण्याचे भान देणारा हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. संतांच्या ग्रंथांतील कठीण सिद्धांत येथे समजावून सांगितले जातात. भारताचा इतिहास व संस्कृतीचे विवेचन केले जाते. ऋषींचे मत व साधूंचे मनोगत आचरणात आणण्याचे शिकविले जाते. आरोग्याची काळजी व योग प्रशिक्षणही दिले जाते. देव, भक्त व नाम ही त्रिवेणी म्हणजे नाम सप्ताह होय. सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला अधिकारानुसार आचरणाची मुभा दिली जाते. जात, पात, धर्म यांना येथे स्थान नाही. जो देवावर प्रेम करतो, तीच एक जात मानली जाते. स्त्री-पुरुष भेद नाही. विविध संतांच्या अभंगांवर विश्लेषण केले जाते. नैतिक आचरण, त्याग व ईश्वराविषयी प्रेम हेच मुख्य सिद्धांत मानले जातात. धर्मांधता नको, तर अंत:करण मोठे असावे, असे या सप्ताहातून शिकविले जाते. हा सप्ताह विधिपूर्वक पार पडतो. पहाटे काकडा भजन होते. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, अल्पोपहार व गाथाभजन होते. भजनाच्या अंतिम टप्प्यात ‘पाऊल्या’ या नृत्यप्रकाराचे सादरीकरण होते. मृदंग व टाळांच्या गजरात नामस्मरण केले जाते. यामध्ये फुगडी, प्रतिस्पर्धात्मक खेळ, खो-खो, घुमरी आदी खेळही रंगतात.
यानंतर जेवण व विश्रांतीनंतर ज्ञानेश्वरी प्रवचन, भागवत किंवा रामायण निरूपण होते. हरिपाठ, रात्री कीर्तन व गावोगावीचे जागर यामुळे हा सप्ताह एक आध्यात्मिक शिबिर ठरतो. यामुळे जीवनाविषयीची जाणीव व कर्तव्यभावना विकसित होते. सज्जनांचा मेळावा असणारा हा सत्संग गावाची एकता साधणारा, मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा आहे. महाराष्ट्रभर हा सप्ताह साजरा केला जातो. मराठवाड्यात संत भगवानबाबांनी नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली. परिसरातील गावांनी एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करण्याची प्रथा आहे. या सप्ताहाचे यंदाचे ९२ वे वर्ष असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून २० किमी पूर्वेला व श्री क्षेत्र भगवानगडाच्या दक्षिणेस १० किमी अंतरावर असलेल्या बडेवाडी (बडेवाडी टोलनाक्याजवळ) येथे ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान हा नारळी सप्ताह संपन्न होत आहे. काल्याच्या दिवशी नामांकित मंडळी उपस्थित राहणार असून, सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
तेथे मी हमाल भारवाही ॥
(संत तुकाराम गाथा – ३३५)