-सरपंच नलिता गरड यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर
दुसरबीड (वार्ताहर) : तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत अखेर राजकीय घडामोडींना उधाण येत सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार दि. ३० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुमताने ठराव पारित झाल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे.
याबाबत असे की, तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, उलट जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे,” असा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय प्रशासनात समन्वयाचा अभाव, विकासकामांतील अनियमितता, सदस्यांशी सहकार्याचा अभाव आणि ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेचा अभाव ही कारणे ठरावात नमूद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून कार्यालयीन कामात सतत हस्तक्षेप होत असल्याचाही गंभीर आरोप सदस्यांनी केला आहे. या सर्व कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये असंतोष उफाळून आला होता आणि अखेर त्यांनी एकत्र येत अविश्वास ठरावाचा मार्ग स्वीकारला.
आज झालेल्या सभेत ठरावावर मतदान घेण्यात आले असता बहुमताने ठराव मंजूर झाला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य – विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, मीनाक्षी विनोद म्हस्के, सुनीता सुरेश भालेकर आणि स्वाती शिवानंद खेडेकर – यांनी ठरावाला पाठिंबा देत स्वाक्षऱ्या केल्या. दरम्यान, या घडामोडींमुळे खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली असून पुढील सरपंचपदासाठी राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गावात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून पुढील राजकीय घडामोडी वेगाने होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता सरपंचपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.