-माऊली मंदिरात पुष्पसजावट, इंद्रायणी घाटावर आरती; हरिनाम गजरात भाविकांची मोठी उपस्थिती
आळंदी (अर्जुन मदणकर) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कामदा एकादशी दिनी प्रथा-परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात पार पडले. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने हरिनाम गजरात इंद्रायणी आरती करण्यात आली. तत्पूर्वी महाप्रसाद वाटप व श्रीगुरु हैबतबाबा दिंडीची पायी नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती.
भाविकांची माऊली मंदिर परिसरासह आसपास मोठी गर्दी झाली होती. श्रींचे दर्शन व प्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली. श्रींना फराळाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करत भाविक व नागरिकांनी इंद्रायणी आरती केली. या प्रसंगी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या संयोजक अनिता झुजम, आवेकर-भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त संयोजक अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर तौर, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी माऊली कुऱ्हाडे पाटील, तसेच स्वाती बेले, लक्ष्मीबाई बेले, विजया इसापुरे, वैभवी बेले, ओम बेले, अनिता शिंदे, शैला तापकीर, सुवर्णा काळे, मेघा काळे, कोमल चव्हाण, स्वाती चव्हाण, सखुबाई चव्हाण, सरस्वती भागवत, पुष्पा लेंडघर, रीनाताई पवार, शोभा कुलकर्णी, नीलम कुरधोंडकर, शकुताई मुंढे, राधा पगारे आदी उपस्थित होते. हरिनाम जयघोषात आरती मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
पालखी सोहळ्याचे ८ जुलैला प्रस्थान
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी ८ जुलै रोजी हरिनाम गजरात श्रींच्या पालखी सोहळ्याचे वैभवी प्रस्थान होणार आहे. सोहळ्यातील पहिला मुक्काम परंपरेने ९ जुलैला होईल. त्यानंतर आळंदीतील गांधीवाडा येथून श्रींची पालखी भल्या पहाटे पुण्याकडे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.
आळंदी ते पंढरपूर या दरम्यान होणाऱ्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच निश्चित होणार असून, त्यानंतर संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात येईल. सोहळा हरिनाम गजरात २४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी पंढरपूर येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे. यंदा पालखी सोहळ्यापूर्वी अधिक मास येत असल्याने हा सोहळा ऐन पावसाळ्यात होणार आहे. या अनुषंगाने नुकतीच पंढरपूर येथे बैठक पार पडली.