अंदाजपत्रकीय सभेत सत्ताधारी-विरोधी नगरसेवक आक्रमक; शिवरायांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद!
अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असलेले अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना आज अहिल्यानगर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेतून सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी अक्षरशः हुसकावून लावले. या प्रकारामुळे महापालिका आवारात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आल्याचा दावा करत छिंदम यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
महापालिकेची महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकीय सभा आज पार पडली. सभा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या उपस्थितीवरच राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला सभागृहात बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका घेत नगरसेवक आक्रमक झाले. काही क्षणातच सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली आणि संतप्त नगरसेवक छिंदम यांच्या दिशेने धावले.
माईक, कागदपत्रांची फेकाफेक : गोंधळ इतका वाढला की, संतप्त लोकप्रतिनिधींनी छिंदम यांच्या समोरील माईक आणि अर्थसंकल्पाची कागदपत्रे भिरकावून दिली. ‘छिंदम गो बॅक’च्या घोषणा देत त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. “संबंधित व्यक्तीला इथून पुढे सभागृहात प्रवेश देऊ नये, अन्यथा आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकू,” असा आक्रमक पवित्रा यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला.
जीवाला धोका असल्याचा छिंदम यांचा दावा : दुसरीकडे, या प्रकारानंतर श्रीपाद छिंदम यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांची भेट घेऊन तक्रार दिली आहे. “मी अंदाजपत्रकातील त्रुटींवर बोट ठेवले आणि विरोधात भूमिका घेतली, म्हणूनच जुन्या मुद्द्याचे भांडवल करून माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझ्या जीवाला धोका आहे,” असा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. या प्रकरणावरून आता शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.