– कारच्या खिडकीत अडकवून ५० मीटर ओढत नेल्याने तरुणाचा मृत्यू!
चिखली (तालुका प्रतिनिधी): चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल गुलमोहरजवळ घडलेल्या थरारक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. खुनानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना चिखली पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बोथाकाजी परिसरातून ताब्यात घेतले. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, न्यायालयाने आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल मारोती शिंदे आणि मृत गणेश भागवत गुड्डा हे दोघे गाडीने (MH-26 CY 0877) हडगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. चिखली हद्दीत हॉटेल गुलमोहरजवळ ते थांबले असता, समोरून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारमधील (MH-01 CJ 5716) व्यक्तींशी गणेशचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी गणेशला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गणेशला कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीत अडकवून सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. या क्रूर कृत्यानंतर आरोपी कारसह पसार झाले होते. उपचारादरम्यान गणेश गुड्डा याचा मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली होती. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी बोथाकाजी (ता. खामगाव) येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथक आरोपींच्या शोधात असतानाच, गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार त्यांना समोरून येताना दिसली. पोलिसांनी हात दाखवूनही चालकाने कार वेगाने पळवली. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता पाठलाग करून गाडी अडवली आणि दोघांना ताब्यात घेतले. शेख शाहरुख शेख प्यारु (वय ३१ वर्षे) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (वय ३३ वर्षे, दोन्ही रा. बोथाकाजी, ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, शरद भागवतकर, विकास देशमुख, विजय किटे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.