-प्रथम पारितोषिक एक लाख रुपये; साखरखेर्ड्यात भव्य क्रिकेट स्पर्धा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) :येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
साखरखेर्डा भागात माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे राजकीय वलय चांगले राहिले आहे. आजही सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे. डॉ. शिंगणे सत्तेत असोत वा नसोत, त्यांच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी आजही कायम आहे. दि. ३० मार्च रोजी त्यांचा ६५ वा वाढदिवस असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावर्षी वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन स्वतः डॉ. शिंगणे यांनी केले होते. मात्र, स्व. अजितदादा पवार यांना आदर्श मानणारी युवा क्रिकेटपटूंची टीम साखरखेर्डा येथे सक्रिय आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्ताने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी माजी सभापती शिवाजीराजे देशमुख, विधानसभा अध्यक्ष सतीश काळे, तालुकाध्यक्ष जगन मामा सहाने, माजी सभापती राजेंद्र ठोके, विजय मोहने, इब्राहिम शहा, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, संग्रामसिंह राजपूत, सुनिल रिंढे, अरुण देशमुख, शुभम राजपूत, अमित जाधव, नितीन ठोसरे, डी. एन. पांचाळ, सुधीर राजपूत, बबलू पवार, आदित्य तिवारी तसेच क्रिकेट स्पर्धेतील खेळाडू उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धांचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले आहे.