-७ एप्रिलच्या कार्यक्रमासाठी समित्यांची नेमणूक; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
लोणार (वाजिद खान) : बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार येथे ७ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या भव्य योग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
या बैठकीस इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO)चे अध्यक्ष व आयुष मंत्रालय सदस्य डॉ. अनंत बिरादार यांनी विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शवली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी होते. यावेळी नंदुभाऊ मापारी, भगवान पाटील सुलताने, पांडुरंग सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगशिक्षकांनी योगगीत व विविध योग प्रात्यक्षिके सादर करून वातावरण प्रसन्न केले. डॉ. बिरादार यांनी मार्गदर्शन करताना योग महोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध समित्यांची नेमणूक करून प्रत्येकाला विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या. योग हा केवळ आयोजकांसाठी नसून जगातील प्रत्येक व्यक्तीच्या निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महोत्सवात सहभागी होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लिंकवरून नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष बळीराम मापारी यांनी उपस्थित योगशिक्षकांचे आभार मानत, त्यांच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली. त्यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे विशेष आभार मानले. लोणारसारख्या ठिकाणी एवढा मोठा योग महोत्सव होत असल्याचा अभिमान व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व योगाचा अवलंब करून निरोगी जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला INO विदर्भ अध्यक्ष डॉ. नारायण अंभोरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. शेख शेककील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. संजना सूर्यवंशी तसेच डॉ. गजानन बाजड, डॉ. प्रेमदास वाकोडे, डॉ. गजानन चेके, डॉ. विठ्ठल देशमुख, डॉ. अनिकेत शिंदे, डॉ. तृप्ती काटेकर, डॉ. मंजू जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.