हातात डफडे, पायात ‘पावली’चा ठेका! रविकांत तुपकरांनी जपली ग्रामीण परंपरेशी नाळ!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेणारे आणि रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा एक वेगळाच आणि अस्सल गावरान अंदाज बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळाला. बुलढाणा तालुक्यातील खुपगाव येथील ऐतिहासिक देवीच्या यात्रेत तुपकरांनी चक्क डफड्याच्या तालावर पारंपरिक ठेका धरत सर्वांची मने जिंकली. त्यांचे हे आगळेवेगळे रूप पाहून ग्रामस्थ आणि भाविकही अवाक झाले.
खुपगाव येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेली देवीची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘देवीचे सोंग’. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे दरवर्षी न चुकता या यात्रेला भेट देतात आणि मनोभावे देवीचे दर्शन घेतात. यंदाही ते या यात्रेत सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या आग्रहाखातर तुपकरांना स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात, देवीच्या सोंगासमोर चक्क ‘पावली’ खेळत पारंपरिक नृत्य सादर केले. डफड्याच्या तालावर ठेका धरून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः डफडे वाजवून वाद्य वाजवणारे कलाकार आणि इतर ग्रामस्थांचा उत्साहही द्विगुणित केला.
राजकारणाच्या आणि शेतकरी आंदोलनांच्या धकाधकीतून वेळ काढत, आपल्या मातीतील ग्रामीण संस्कृती आणि परंपरेशी असलेली स्वतःची नाळ त्यांनी आजही तितकीच घट्ट जपली असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. एरवी आक्रमक भाषणांनी मैदाने गाजवणारे रविकांत तुपकर थेट डफड्याच्या तालावर नाचताना पाहून उपस्थितांच्याही उत्साहाला उधाण आले होते.