सर्वधर्मीय ग्रामस्थांकडून श्रीरामाचे पूजन; भव्य मिरवणुकीत महिलांचा फुगड्यांचा फेर!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : भक्तीचा मलोन्मेष आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत साखरखेर्डा नगरीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सजविलेल्या रथातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत सर्वधर्मीय ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभू श्रीरामाचे पूजन केले.
स्थानिक श्रीराम मंदिरात सकाळी श्रीराम चरित्राचे वाचन करण्यात आले. दुपारी ठीक १२ वाजता पुष्पवृष्टी आणि जयघोषात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यासह माळीपेठमधील श्रीराम मंदिर, श्री प्रल्हाद महाराज मंदिर आणि रोकडोबा हनुमान मंदिर येथेही धार्मिक विधी पार पडले. दुपारी ३ वाजता ढोल-ताशांच्या गजरात साखरखेर्डा नगरीतून श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक ग्रामपंचायत परिसरात आली असता, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत यांच्यासह माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी उपसरपंच सैय्यद रफीक, इब्राहिम शहा, युनूस नाईकवाडी, असलम अंजूम यांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मुस्लीम बांधवांच्या या सहभागामुळे गावात सामाजिक ऐक्याचा संदेश अधोरेखित झाला.
यावेळी सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मिरवणुकीत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, चंद्रशेखर शुक्ल, भाग्यश्री खेडेकर, योगेश जाधव, दिलीप बेंडमाळी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता श्री प्रल्हाद महाराज संस्थान येथे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते आरतीने करण्यात आली.
मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पारंपारिक वेशभूषेतील महिलांनी फेर धरत फुगड्यांचा आनंद लुटला, ज्यामुळे मिरवणुकीत विशेष रंगत आली. महोत्सवाचे नियोजन सीताराम काळे, रावसाहेब देशपांडे, देवेंद्र देशपांडे, गोपाल शिराळे व उत्सव समितीच्या सदस्यांनी केले होते. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.