गुरुवारी सकाळी ९ वाजता पोफळ शिवनी येथे अंत्यसंस्कार
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : ग्रामीण भागातील सहकार चळवळीला बळ देणारे खंबीर नेतृत्व आणि पोफळ शिवनी येथील माजी सरपंच लालाराव देशमुख (वय ६९) यांचे बुधवारी (ता. २५) अल्पशा आजाराने निधन झाले. सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांच्या तालमीत तयार झालेले आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
लालाराव देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात विविध महत्त्वपूर्ण पदांवर ठसा उमटवला. पोफळ शिवनीचे सरपंच म्हणून त्यांनी गावच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर बुलढाणा जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या संचालकपदी पाच वर्षे त्यांनी काम पाहिले. याशिवाय सिंदखेडराजा तालुका खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
१९९२ मध्ये कै. भास्करराव शिंगणे यांच्या आदेशानुसार त्यांनी मलकापूर पांग्रा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती. निष्ठवान कार्यकर्ता आणि सहकारातील जाणकार व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
आज अंत्यसंस्कार – लालाराव देशमुख यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. २६) सकाळी ९ वाजता पोफळ शिवनी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.