-गॅस सिलिंडरचा स्फोट; ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : बोधेगाव येथील विकास घोरतळे यांच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमध्ये मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून तीन दुकाने जळून खाक झाली. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दल वेळेवर उपलब्ध नसल्याने स्थानिक युवकांनी पुढाकार घेत पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या भीषण आगीत गजानन कैलास शहाणे यांचे सोन्या-चांदीचे दुकान तसेच राजेंद्र हुलजुते यांची भांडी व फर्निचरची दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एका दुकानात असलेल्या गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे बोधेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.