-१९ ते २६ मार्चदरम्यान भजन, कीर्तन, नृत्य व संगीत कार्यक्रमांची पर्वणी
आळंदी (प्रतिनिधी) : येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट, राम मंदिर आळंदी देवाची यांच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त १९ मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात संगीत, नृत्य, भजन, नारदीय कीर्तन आदी कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळत आहे.
दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत वेद पाठशाळा आळंदी यांच्या मार्फत रुद्र अभिषेकाचे मंत्रपठण केले जात आहे. तसेच भरतनाट्यम सादरीकरण, भक्तीपूर्व वाद्यसंगीत, अभंगवाणी, भावगीत, रामलीला, गजर रामनामाचा, सेक्सोफोन वादन, संतवाणीवरील कार्यक्रम, भजन, बासरी वादन, वारकरी भजन आणि शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. या कार्यक्रमांत पंडित रमाकांत पराजपे, ज्ञानेश्वरी ताई रोकडे महाराज, रामकृष्णजी गरड महाराज, सौ. मुक्ता कुलकर्णी, सई देशपांडे, नितीन आवेकर, संजय भावे, सौ. अर्पणा केळकर, अमिता घुगरी, तुषार रिठे, हेमंत आठवले, अमित खरे, सौ. ज्योती गोराणे, ह.भ.प. आबा महाराज गोडसे, सौ. विद्या इंगळे, सौ. रमा चोभे आदी कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे.
या सर्व कलाकारांचा सत्कार संस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल आवेकर तसेच विश्वस्त अविनाश गुळुंजकर, अर्जुन मेदनकर, लक्ष्मीकांत दंडनाईक, चिन्मय चोभे, रमेश मुसुडगे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. रामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.