-शिंगोरीत नारळी सप्ताहात भव्य मिरवणूक; भक्तिमय वातावरणात जल्लोष
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्रातील नारळी सप्ताह परंपरेची सुरुवात संत भगवान बाबा यांनी केली असून त्यांच्या कार्याचे अनुकरण आज अनेक ठिकाणी होत असल्याचे प्रतिपादन भगवानगडचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.

शिंगोरी येथे सुरू असलेल्या ४८ व्या नारळी सप्ताह उत्सवात सातवे पुष्प अर्पण करताना ते भाविकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी संत परंपरेचा गौरव करत भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. दरम्यान, नारायण महाराज यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या उत्सवात डॉ. शास्त्री यांच्या आगमनानिमित्त त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीत महिला भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा, भजन-कीर्तन आणि धार्मिक उत्साहामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. सायंकाळी आदिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी दिंडी मिरवणूक काढून उत्सवात आणखी भर घातली. या कार्यक्रमामुळे शिंगोरीत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून नारळी सप्ताह उत्सव अधिक उत्साहात साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
संतांचे मार्गदर्शन – जीवनाचा पाया : महंत शास्त्री
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आईची सेवा करून कर्तव्य, संस्कार आणि भक्ती यांचा आदर्श घालून दिला. जीवनात आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे, हे त्यांच्या आचरणातून स्पष्ट होते.
संतांच्या सहवासाने माणसाचे जीवन घडते. संत जेव्हा जागृती करतात, तेव्हा आयुष्याचे सोने होते — कारण ते योग्य मार्ग दाखवतात आणि माणसाला आत्मिक उन्नतीकडे नेतात. माणिक बाबा, भगवान बाबा आणि नारायण गुरु यांसारख्या संतांनी समाजाला दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अनेक धार्मिक परंपरा आणि सप्ताह टिकून राहिले. हस्तलिखित परंपरा, संतांचे विचार आणि त्यांचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संतांचे मार्गदर्शन नसते, तर अशा धार्मिक परंपरा आणि सप्ताह इतक्या प्रभावीपणे उभे राहिले नसते, असे भाविकांना उपदेश करताना डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले.
चौकट : भव्य महाप्रसादाचे आयोजन
शिंगोरी येथे सुरू असलेल्या नारळी सप्ताह उत्सवात भाविकांसाठी दररोज भव्य प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रसादात तब्बल बाराशे लिटर शिंगोरी आमटी तसेच लाखो भाकरींचे वाटप केले जात असून हजारो भाविक याचा लाभ घेत आहेत. भक्तीमय वातावरणात चालणाऱ्या या सप्ताहात ग्रामस्थ, सेवेकरी आणि भाविकांच्या सहकार्याने प्रसाद व्यवस्था सुरळीत पार पडत आहे. शिस्तबद्ध नियोजनामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. या भव्य व्यवस्थेमुळे नारळी सप्ताहाची कीर्ती अधिक वाढत असून परिसरात धार्मिक उत्साह शिगेला पोहोचला आहे.