– ५५ वर्षांनंतर मतदारसंघांची पुनर्रचना; ‘खामगाव’ लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळणार?
– २०२९ चा ‘मास्टरप्लॅन’ तयार; चिखली-सिंदखेडराजाच्या समीकरणात मोठी उलथापालथ!
– ३३ टक्के महिला आरक्षणाचा आणि रोटेशनचा फास; दिग्गजांचे बालेकिल्ले धोक्यात!
नवी दिल्ली/बुलढाणा (बाळू वानखेडे) : “देशाच्या लोकशाहीचा कणा असलेल्या मतदारसंघांच्या रचनेत तब्बल साडेपाच दशकांनंतर मूलभूत बदल करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. १९७२ पासून गोठवण्यात आलेली मतदारसंघांची संख्या आता २०११ च्या जनगणनेच्या आधारावर दीडपट वाढवण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, याचे सर्वाधिक पडसाद बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय भूगोलावर उमटण्याची शक्यता आहे. केवळ विधानसभेच्या जागांत वाढच नव्हे, तर ‘खामगाव’सारख्या नव्या लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीमुळे प्रस्थापित सत्तासमीकरणे पूर्णतः मोडीत निघणार असल्याचे चित्र आहे.”
देशाच्या राजकारणात आता एका महाभूकंपाची तयारी सुरू झाली असून, दिल्लीच्या तख्तावरून मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा फास आवळला जाणार आहे. गेली ५५ वर्षे थंड बस्त्यात पडलेला मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा विषय आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार असून, लोकसभा आणि विधानसभेच्या जागांमध्ये तब्बल दीडपट वाढ करण्याचा घाट केंद्र सरकारने घातल्याची खात्रीशीर माहिती आहे. विशेष म्हणजे, आगामी २०२९ च्या निवडणुका या ३३ टक्के महिला आरक्षणाच्या बेड्यांसह होणार असून, अनुसूचित जाती-जमातींच्या राखीव जागांच्या समीकरणातही मोठी उलथापालथ होणार आहे.
या पुनर्रचनेचा सर्वाधिक आणि ऐतिहासिक तडाखा बुलढाणा जिल्ह्याला बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नव्या रचनेनुसार जिल्ह्याचा राजकीय नकाशाच पुसला जाऊन नवा नकाशा कोरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात तब्बल तीन नवे विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येणार आहेत. यामध्ये लोणार तालुक्यासह सिंदखेडराजाचा काही भाग जोडून ‘लोणार विधानसभा’ हा नवा बालेकिल्ला तयार होऊ शकतो. तसेच खामगाव आणि शेगावचा भाग मिळून स्वतंत्र ‘शेगाव विधानसभा’ आणि देऊळगाव राजासह चिखलीचा काही भाग मिळून ‘देऊळगाव राजा विधानसभा’ असे नवे मतदारसंघ आकाराला येण्याची शक्यता आहे.
सर्वात मोठी खळबळजनक बातमी म्हणजे, जिल्ह्याच्या राजकारणात ‘खामगाव लोकसभा’ या नव्या मतदारसंघाची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे! यामध्ये मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद, रावेर किंवा बाळापूर या विधानसभा क्षेत्रांची जुळवाजुळव केली जाऊ शकते. या नव्या मांडणीमुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्रात ४३२ आमदारांची फौज?
१९७२ पासून देशात लोकसभेच्या ५४२ जागा स्थिर आहेत, मात्र या काळात लोकसंख्या अफाट वाढली. आता २०११ च्या जनगणनेचा आधार घेत ही पुनर्रचना रेटली जाणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर विधानसभेच्या सध्याच्या २८८ जागांमध्ये १४४ जागांची भर पडून हा आकडा थेट ४३२ वर जाण्याची शक्यता आहे. चालू अधिवेशनातच याबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची तयारी पूर्ण झाली असून, बहुमताच्या जोरावर हे विधेयक रेटून नेण्याचा दिल्लीश्वरांचा मानस आहे.
महिला आरक्षण आणि रोटेशनचा फास!
३३ टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ पासून होणार असल्याने अनेक ‘वस्ताद’ नेत्यांचे पत्ते कट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच राखीव मतदारसंघांचे ‘रोटेशन’ (अदलाबदल) झाल्यास अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त होऊ शकतात. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत विविध पक्षांशी पडद्याआडून चर्चा सुरू केली असून, २०२८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. थोडक्यात काय, तर मतदारसंघांच्या या नव्या ‘खिचडी’मुळे लोकशाहीचा विस्तार होणार की सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे राजकारण साधले जाणार, हे येणारा काळच ठरवेल!
बुलढाणा जिल्ह्यातही लोणार तालुक्यासहसह सिंदखेडराजा तालुक्यातील काही भाग घेऊन लोणार विधानसभा, खामगाव व शेगाव तालुक्यातील काही भाग घेऊन शेगाव , तसेच देऊळगाव राजा तालुक्यासह चिखली तालुक्यातील काही भाग घेऊन देऊळगाव राजा विधानसभा हे नवीन विधानसभा मतदारसंघ होवू शकतात. तसेच मलकापूर , खामगाव, जळगाव जामोद, रावेर किंवा बाळापूर विधानसभा मिळून खामगाव लोकसभा मतदारसंघ होवू शकतो, असेदेखील सूत्राने सांगितले. असेच सर्वच जिल्ह्यांत मतदारसंघ वाढणार आहेत. सध्यातरी याबाबत वरिष्ठांकडून काहीही आदेश आले नसल्याचे सहाय्यक महसूल अधिकारी जीवन ढोले यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.