शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर डांबरीकरण सुरू; निकृष्ट कामाबाबत प्रशासनाला सज्जड दम!
चिखली (तालुका प्रतिनिधी): प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे दीर्घकाळापासून रखडलेल्या एकलारा ते खंडाळा शिव रस्ता कामाला अखेर मुहूर्त लाभला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी प्रशासकीय यंत्रणेला जेरीस आणत दिलेल्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, पहिल्या टप्प्यातील चार किलोमीटरच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.
प्रवाशांचा ‘मृत्यूचा सापळा’ बनला होता मार्ग : चिखली – खंडाळा मकरध्वज ते एकलारा हा मार्ग प्रवाशांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गाची चाळण झाली होती. विशेषतः शेलगाव ते एकलारा रस्ता पूर्णपणे उखडल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. “निधी उपलब्ध नाही” किंवा “तांत्रिक अडचणी” अशी कारणे पुढे करत प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात होती. मात्र, सर्वसामान्यांचे हाल ओळखून विनायक सरनाईक यांनी थेट मैदानात उतरण्याचा पवित्रा घेतला.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश : हा रस्ता एकलारा, भोरसा, भोरसी, पाटोदा, पेंनसांवगी आणि पांढरदेव या गावांसाठी चिखली शहरात पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. वाढते अपघात आणि विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबवण्यासाठी सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (बुलढाणा) आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. “रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिल्यानंतर यंत्रणा गतिमान झाली. सध्या या मार्गावर डांबरीकरणाचे रोलर फिरू लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुणवत्तेशी तडजोड नको; अन्यथा पुन्हा ‘क्रांतिकारी’ स्टाईलने उत्तर!
डांबरीकरणाला सुरुवात झाली असली तरी केवळ वरपांगी मलमपट्टी करून चालणार नाही, असा इशारा विनायक सरनाईक यांनी दिला आहे. रस्त्याच्या कामासोबतच रखडलेली पुलांची उंची वाढवणे, गावालगतच्या नाल्यांची कामे पूर्ण करणे आणि उर्वरित रस्ता तातडीने मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “कामाचा दर्जा राखला जावा, अन्यथा पुन्हा एकदा शेतकरी संघटनेच्या शैलीत उत्तर दिले जाईल,” असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.