-वासराची शिकार; बिबट्या प्रत्यक्ष नजरेस आल्याने शेतकरी भयभीत
लोणार (वाजिद खान) : वझर आघाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत बिबट्याने एका वासराची शिकार केल्याचे उघडकीस आले असून शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वझर आघाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात गहू काढण्याचे काम मशीनद्वारे सुरू होते. त्याच वेळी शेतात एक वासरू मृत अवस्थेत आढळून आले. वासरू मारलेले असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता जवळच दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला.
बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी तत्काळ आरडाओरड केली. आवाज होताच बिबट्याने तेथून पळ काढत जवळील मक्याच्या शेतात जाऊन लपल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी तसेच सरपंच संतोष साळवे यांनी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदूभाऊ मापारी यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्याची विनंती केली. मात्र वृत्त लिहीपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून जनावरांची विशेष काळजी घ्यावी तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.