–आवेकर भावे रामचंद्र संस्थानतर्फे नारदीय कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान (ट्रस्ट) तर्फे परंपरेनुसार श्री रामनवमी निमित्त श्री रामजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुढी पाडव्यापासून श्री रामनवमीपर्यंत गुरुवार (दि. १९) ते गुरुवार (दि. २६) या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
यंदाचा हा सोहळा १८६ व्या वर्षात प्रवेश करत असून या अंतर्गत श्री राम मंदिरात संगीत, नृत्य, भजन, नारदीय कीर्तन आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. १९ मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांत रुद्राभिषेक, नारदीय कीर्तन, भरतनाट्यम, भजन, रामलीला, संकीर्तन, भक्ती संगीत तसेच आळंदीकर ग्रामस्थांची भजन सेवा यांचा समावेश आहे. या सोहळ्यामुळे आळंदी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप २६ मार्च रोजी श्री राम जन्म कीर्तन व श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा मिरवणुकीने होणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून भक्तांमध्ये आध्यात्मिक विकासासोबत सांस्कृतिक समृद्धी वाढविण्याचा उद्देश असल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले. संस्थानच्या पंच मंडळाने भाविक व नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.