-अलंकापुरीत आदर्श माता विमलकाकू कुऱ्हाडे पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ धार्मिक उपक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्र आळंदीतील ज्येष्ठ नागरिक, आदर्श माता तसेच विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या माजी चेअरमन श्रीमती विमलकाकू गोपाळराव कुऱ्हाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व संगीतमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हरिनामाच्या गजरात हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
या ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता माऊली महाराज सावर्डेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. पुण्यस्मरणानिमित्त आळंदी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शास्त्रीय संगीत भजन तसेच भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भाविक, वारकरी आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष विलासराव कुऱ्हाडे पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे पाटील, भैरवनाथ उत्सव कमेटी आळंदीकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील, रामभाऊ कुऱ्हाडे पाटील मित्र परिवार तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.
सोहळ्यादरम्यान शास्त्रीय संगीत गायन, भागवत कथा व भजन कार्यक्रमांमुळे उपस्थित भाविकांना श्रवणसुखाचा अनुभव मिळाला. आळंदी पंचक्रोशीसह राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संगीत भजन गायक, वादक व साधक यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, उपरणे व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सोहळ्यादरम्यान अन्नदान सेवेतून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.