-आळंदीतील नदी प्रदूषणाबाबत आक्रमक भूमिका; तातडीने उपाययोजनांची मागणी
आळंदी(अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्र आळंदीची जीवनवाहिनी आणि लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत अखिल भारत हिंदू महासभेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. नदीतील सांडपाणी, वाढती जलपर्णी आणि दूषित पाण्याच्या समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ तसेच नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. आळंदीतील मैलापाणी आणि ड्रेनेजचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेली जलपर्णी आणि टाकाऊ राडारोडा यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळित होत असून पाणी अधिक दूषित होत असल्याचे महासभेने नमूद केले आहे. नदी स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्यासाठी तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प प्रभावीपणे कार्यान्वित करून पाणी स्नानयोग्य व सुरक्षित ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी साठवण बंधाऱ्याची दुरुस्ती करून गळती थांबवावी आणि नदी परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियमित पोलीस गस्त सुरू करावी, असेही निवेदनात नमूद आहे.
“इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू,” असा स्पष्ट इशारा वैभवराज रौंदळ यांनी दिला. यावेळी राष्ट्रीय संरक्षक श्री श्री 1008 जगतगुरू स्वामी माधवानंद सरस्वती महाराज, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष योगेंद्र वर्मा, राष्ट्रीय धर्मप्रचारक महंत शिवनाथ महाराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगी दादानाथ महाराज, योगी ऋषिकेशनाथ महाराज, महंत सचिदानंद सरस्वती महाराज, महंत योगानंद सरस्वती महाराज, महंत केशवानंद सरस्वती महाराज, भावेश बळीराम पाटील, प्रदेश प्रभारी योगी सिद्धनाथ महाराज, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगी शीतलनाथ महाराज, योगी प्रकाशनाथ महाराज, योगी सुंदरनाथ महाराज, योगेश निंबाळकर, महाराष्ट्र राज्य महिला प्रभारी सौं. राणी पवार, महिला अध्यक्ष सौ. आरती राजपूत, जिल्हाध्यक्ष सौ. प्रिया राव, जिल्हा उपाध्यक्ष पुनम गांगुर्डे, विधी विभागाचे पदाधिकारी अंकित वाघ, दिनेश माळी, अजिंक्य महांकाळे, पत्रकार पदाधिकारी शशिकांत शिंदे, विष्णू भाऊ बिचकुले, अशोक कुमार नानू राठोड आदी उपस्थित होते. या निवेदनामुळे प्रशासकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांनी महासभेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.