-५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेसाठी संचालक मंडळाचे नियोजन; पुढील हंगामासाठी ६ लाख मेट्रिक टनांचे उद्दिष्ट
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची सांगता रविवारी उत्साहात पार पडली. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही शेतकरी, तोडणी कामगार, अधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या एकजुटीमुळे हा हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे प्रतिपादन माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी केले.
यावेळी बोलताना प्रतापराव ढाकणे म्हणाले की, पुढील गळीत हंगाम अधिक आव्हानात्मक असणार असून कारखान्याची गाळप क्षमता सुमारे ५ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक बाबींचा अभ्यास केला जात आहे. पुढील हंगामात सुमारे ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उसाची लागवड समाधानकारक झाल्याने हंगाम लवकर सुरू करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुरेशा उसाचा अभाव असतानाही राज्यात काही ठिकाणी अनावश्यक गाळप क्षमता वाढविण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कर्ज घेणे सोपे असले तरी त्याची वेळेवर परतफेड करणे अत्यंत जिकिरीचे असते, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असे ते म्हणाले. चालू हंगामातील ऊस उत्पादक आणि कामगारांचे थकीत देयके एप्रिल अखेरपर्यंत अदा करण्यात येतील, अशी ग्वाही देत पुढील दोन-तीन वर्षांत केदारेश्वरची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अडचणीच्या काळात आर्थिक मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी जाहीर आभार मानले.
कार्यक्रमास प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर संजय गोंदे, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, राजाजी बुधवंत, कमलेश संचेती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय गोंदे यांनी योग्य नियोजन आणि शिस्तीच्या बळावर हा हंगाम पूर्ण केल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले. संतोष मुटकुळे यांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर टेल लॅम्प, परावर्तक पट्ट्या बसविणे व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर केदारेश्वरच्या गव्हाणीची विधिवत पूजा करण्यात आली. प्रास्ताविक उपाध्यक्ष माधव काटे यांनी केले व हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला. भाऊसाहेब पोटभरे, अजित शिरसाट, डॉ. चंद्रशेखर घनवट, अशोक पातकळ, संचालक आयुब शेख आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, शहादेव पातकळ, शिवाजी जाधव, अशोक तानवडे, त्रिंबक चेमटे, सदाशिव दराडे, वसंतराव सानप, संग्राम काकडे, त्रिंबक दराडे, संदीप बोडखे, महादेव खेडकर, बाळासाहेब संचेती, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, लेखाधिकारी तीर्थराज घुंगरड, शेतकी विभागाचे अभिमन्यू विखे, मुख्य रसायनतज्ज्ञ रामनाथ पालवे, प्रशासन प्रमुख पोपट केदार तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, तोडणी मुकादम आणि परिसरातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश दहिफळे यांनी मानले.
छायाचित्र: केदारेश्वरच्या गव्हाणीची विधिवत पूजा करताना संजय गोंदे, संतोष मुटकुळे, प्रतापराव ढाकणे, माधव काटे, राजाजी बुधवंत, कमलेश संचेती आदी.