-हिवरा आश्रम येथे जिल्हास्तरीय रोजगार कक्ष कार्यशाळेत तज्ज्ञांचे प्रतिपादन
हिवरा आश्रम (प्रतिनिधी) : केवळ पदवी संपादन करून नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा बदलत्या काळाची दिशा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कौशल्यवृद्धी करणे आवश्यक आहे. उद्योग-तंत्रज्ञानातील बदल झपाट्याने होत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी येथे व्यक्त केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, हिवरा आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोजगार कक्ष समन्वयकांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे समन्वयक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, आपत्कालीन सहाय्य व व्यक्तिमत्व विकास योजनांची माहिती दिली. ‘नशामुक्त भारत’ मोहिमेत शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी युवकांनी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
अधिसभा सदस्य अॅड. संकेत सावजी यांनी विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता रोजगार निर्मिती करणारे उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी शासनाच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा. स्वप्नील तिजारे यांनी उद्योग क्षेत्रातील बदलांचा आढावा घेत व्यक्तिमत्व विकास आणि संवादकौशल्यांशिवाय प्रगती कठीण असल्याचे नमूद केले. प्रा. केदार ठोसर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनांची माहिती दिली, तर डॉ. सोपान वतारे यांनी कलागुणांना व्यावसायिक दृष्टीकोन देण्याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, प्राचार्या डॉ. मीना निकम, विश्वस्त अशोक गिऱ्हे, प्रा. गजानन ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीना निकम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. समता कस्तुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जयप्रकाश सोळंकी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमोल शेळके, प्रा. सौरभ आंबेकर व महाविद्यालयीन चमूने परिश्रम घेतले.