-‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत सेल्फ डिफेन्स व अँटी रॅगिंग विषयावर कार्यशाळा
आळंदी (अर्जुन मेदनकर) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि रॅगिंग प्रतिबंध या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी प्रस्ताविकेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण किती आवश्यक आहे, याचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्य वक्त्या ॲड. पदमावती पाटील, सहसचिव – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन, यांनी रॅगिंग प्रतिबंध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. रॅगिंग म्हणजे काय, त्याचे दुष्परिणाम काय होतात तसेच भारतीय राज्यघटनेतील तरतुदी आणि संबंधित कायद्यांनुसार विद्यार्थिनींनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत त्यांनी माहिती दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा कसा उपयोग होऊ शकतो, यावरही त्यांनी विविध उदाहरणांसह मार्गदर्शन करत स्वसंरक्षण ही आधुनिक काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करताना कु. पायल पाटील, तायक्वांदो-कराटे प्रशिक्षक, यांनी स्वसंरक्षणाची संकल्पना, त्याचा इतिहास आणि प्रशिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कराटेचे विविध प्रकार तसेच लाठी-काठी, ननचकू यांसारख्या प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शितल जाधव यांनी ‘स्वजाणीव व आरोग्य’ या विषयावर भाष्य करताना आधुनिक स्त्रीने स्वतःची ओळख, आत्मविश्वास आणि आरोग्य यांची जाणीव ठेवणे किती आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन केले. स्त्रीच्या विविध भूमिकांचा उल्लेख करत त्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व विशद केले. बदलत्या काळात पुरुष मानसिकतेत परिवर्तन होण्याची गरज असून विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी तत्पर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्थेचे खनिजदान मयूर मुरलीधर ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास प्रवीण भावे, प्रा. प्रफुल्ल जाधव, प्रा. रोहित कांबळे, प्रा. डॉ. देवानंद गोरडवार, प्रा. प्रभाकर गायकवाड, प्रा. डॉ. रंजीत कदम, प्रा. रेखा सुतार, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. रूपाली औटे, प्रा. पूजा खेडकर, प्रा. प्राजक्ता पवार, सौ. वर्षा ताजने, सचिन गावडे, वैभव बडवे, श्रीकांत कांबळे तसेच विविध विभागांचे प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कला, वाणिज्य, बी.बी.ए.(सी.ए.) व बी.सी.ए. शाखेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सविता मानके यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.