-श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट; इंद्रायणी आरती उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) – अलंकापुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदी येथे आमलकी एकादशी निमित्त माऊली मंदिर, आळंदी येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांतून एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
एकादशी दिनी पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे पदाधिकारी, व्यवस्थापक, पुजारी, सेवक व कर्मचारी उपस्थित होते. दिवसभर भाविकांनी मंदिर दर्शनासोबत नगरप्रदक्षिणा घालत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. गाभाऱ्यातील आकर्षक पुष्पसजावटीमुळे श्रींचे रूप अधिकच मनोहर दिसत होते. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता कमी वेळेत अधिकाधिक दर्शन व्हावे यासाठी व्यवस्थापक माउली वीर व उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, सुरक्षा रक्षक व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने नियोजन केले. दुपारी फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे प्रवचन आणि रात्री धुपारती परंपरेनुसार पार पडली. दर्शनापूर्वी अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नान व आचमन केले.
एकादशी निमित्त घाटावर ‘इंद्रायणी आरती सेवा समिती’च्या वतीने हरिनाम गजरात इंद्रायणी आरती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमात इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. आरतीनंतर पसायदान व प्रसाद वाटप करण्यात आले. तत्पूर्वी घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. भाविकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.
दरम्यान, शहरातील बेकायदेशीर पार्किंग व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा वाहने न लावता इमारतीखालील पार्किंगमध्येच वाहने उभी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बांधकाम परवानगीप्रमाणे राखीव पार्किंगचा वापर अन्य कारणासाठी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, तसेच नदी प्रदूषणमुक्तीसाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन संयोजक अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी आरती सेवा समितीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.