-शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण; अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप
सिंदखेडराजा (अशोक इंगळे): बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी, २० फेब्रुवारीला मोठा संघर्ष उडाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर गावातील काही लोकांनी मारहाण केली, अशी तक्रार करण्यात आली आहे. मारहाणीत त्यांच्या अंगावरचा कपडा फाडल्याचा आरोप संजीवनी वाघ यांनी केला असून, हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणाव वाढला आहे.
संजीवनी वाघ यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये “सगळं संपलं! उद्या सकाळी आत्महत्ती करते” असा संदेश दिल्याचे समोर आले आहे. हा संदेश प्रसारित झाल्यानंतर पूरे चिखला काकड गावात तणाव निर्माण झाला आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
मारहाण कशी झाली?
सुरुवातीस मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र नंतर गावातील सरपंच व त्यांच्या समर्थकांकडून तो पुतळा हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप आहे. संजीवनी वाघ यांनी या हालचालींचा विरोध केला असता, गावातील काही पुरुष व महिला एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या कपडे फाडल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल आहे, ज्यात पोलिसांच्या उपस्थितीत संजीवनी वाघ यांच्या अंगावर कपडे फाडले जात असल्याचे दिसत आहे. संजीवनी वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची ही सजा आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पोलीस प्रशासन आणि मनसेचे भाष्य
पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून सुरक्षेचा बंदोबस्त वाढविला आहे. तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वांना शांततेचे संदेश दिले आणि पोलिस प्रशासनाला कडक कारवाई करण्याचा आग्रह केला.
या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता व काही काळ रस्ता रोकोचा आंदोलनही केला गेला. समाजआजच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्षांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.