-प्रशासक सरपंचासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती पाहणार कारभार
-राज्य शासनाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासकीय समिती नियुक्तीचे आदेश
मुंबई / बुलढाणा (बाळू वानखेडे) : अखेर मुदत संपलेल्या तसेच चालू महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. संबंधित ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार असून, विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. शासनाने २० फेब्रुवारी रोजी याबाबतचे राजपत्र काढले असून, ग्रामविकास विभागाने २१ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
राज्यातील जवळपास १४ हजार ग्रामपंचायतींची मुदत या महिन्यात संपत आहे, तर काहींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. या मुदत संपणाऱ्या व संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीबाबत जानेवारी महिन्यात शासनाने काढलेले आदेश नंतर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनात अनिश्चितता निर्माण झाली होती.
दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी शासनाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी तातडीने राजपत्र प्रसिद्ध करून २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करणे तसेच विद्यमान उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे आदेश किमान सहा महिने किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव आसोले यांनी २१ फेब्रुवारी रोजी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय समिती नियुक्त होणार आहे. दुसरीकडे, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात किंवा गावातील विविध समस्या लक्षात घेऊन विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका सरपंच संघटनेचे दळवी यांच्यासह इतरांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या प्रलंबित याचिकेवर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नव्या राजपत्रानुसार विद्यमान पदाधिकाऱ्यांना सहा महिने किंवा पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ठप्प असलेला ग्रामपंचायतींचा कारभार आता पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान याबाबत बोलताना सरपंच संघटनेचे अरूण दळवी म्हणाले की,हा एकटयाचा विजय नसून, गावगाडयातील सर्वच सरपंच मंडळीचा विजय आहे. यासाठी ऍड. स्वप्निल कारंजकर यांचेही मोठे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.
दरम्यान विद्यमान सरपंचासह सर्वच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनाच ग्रामपंचायत प्रशासक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर सह राज्यातील काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती.