-चौघे जखमी; दोन्ही गटांतील १९ जणांवर गुन्हे दाखल – आजी व माजी सभापतींचा समावेश
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : पोलीस स्टेशन हद्दीत काल गावागावांत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना गुंज येथे डीजे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत चौघेजण जखमी झाले असून दोन्ही गटांतील एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुंज येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत युवक डीजेच्या तालावर सहभागी झाले होते. मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर आली असता, घरात अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने डीजे पुढे लावावा, अशी विनंती त्यांनी केली. यावरून वाद निर्माण होऊन काही युवकांनी मागील राजकीय वाद उकरून काढत अनिल तुपकर, त्यांचे आई-वडील व भावाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यात मुरहरी तुपकर यांना गंभीर मार लागला, तर त्यांच्या आईलाही मारहाण होऊन त्या जखमी झाल्या. मुरहरी तुपकर हे माजी सैनिक असून १९६२ च्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता.
अनिल तुपकर यांच्या तक्रारीवरून अमोल सुरेश तुपकर, सुरेश माधवराव तुपकर, ऋतिक गजानन तुपकर, शाम सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, कार्तिक अनंता तुपकर, समर्थ गणेश तुपकर, चेतन गणेश तुपकर, अनंता केशव तुपकर, कडूबा मनोहर तुपकर, पवन परसराम तायडे, अक्षय पप्पू तुपकर, प्रथमेश रमेश तुपकर, रमेश माधवराव तुपकर आदींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११८(२), १९१(२), १९१(३), १२५(B), ३३३, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सुरेश माधवराव तुपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, शिवजयंती मिरवणूक सुरू असताना ऋतिक गजानन तुपकर यास घराजवळ अडवून अनिल तुपकर मारहाण करीत होते. तसेच मुरहरी तुपकर हातात काठी घेऊन समर्थ तुपकर यास मारहाण करीत होते. ती काठी काटेरी असल्याने सुरेश तुपकर यांच्या हाताला व दाढीला दुखापत झाली. अशोक तुपकर यांनीही काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात अक्षय हा जखमी झाला असल्याचे नमूद आहे.
या फिर्यादीवरून अनिल मुरहरी तुपकर, मुरहरी बाजीराव तुपकर, अशोक मुरहरी तुपकर, विठ्ठल जनार्दन तुपकर, योगेश रामचंद्र तुपकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल तुपकर तसेच माजी सभापती सुरेश तुपकर यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी नाली बांधकामाच्या वादातून याच ठिकाणी दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.