-शिवमय जल्लोषात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव २०१६ सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्यविषयक विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आळंदी पंचक्रोशीत शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
यावर्षीही शिवस्वराज्य प्रतिष्ठान, रौद्र शंभो फाउंडेशन व समस्त आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. प्रत्येक रक्तदात्यास शिवरायांच्या विचारांचे पुस्तक भेट देण्यात आले. पोवाडे व शिवगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण मंगलमय झाले. “गाथा हिंदवी स्वराज्याची” हे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या नगरीत विविध सेवाभावी संस्था, सर्वपक्षीय संघटना, वारकरी भाविक, इंद्रायणी आरती सेवा समिती तसेच ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेचे प्राचार्य विजय गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिवजन्मोत्सवाला रंगत आणली.
आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर व सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. खासदार संजय उर्फ बंडू जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिरात हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश दिला. सहभागी रक्तदात्यांना शिवचरित्र पुस्तक, प्रमाणपत्र व डोनेट कार्ड देण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. शिवस्वराज्य प्रतिष्ठान, रौद्र शंभो फाउंडेशन, समस्त आळंदी ग्रामस्थ व आळंदी नगरपरिषद यांच्या विशेष परिश्रमांमुळे आळंदीत शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी आणि शिवमय जल्लोषात उत्साहात साजरा झाला.