-युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांची मागणी
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : राज्य शासनामार्फत कार्यकाळ पूर्ण झालेल्या मात्र निवडणूक न झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून माजी सरपंच किंवा तत्सम व्यक्तींची नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती न करता त्या ठिकाणी देशासाठी अहोरात्र सेवा बजावलेल्या माजी सैनिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवाजी शिराळे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. देशासाठी झटलेले सैनिक प्रामाणिक, शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष असतात. “जीव जाईल पण वचन जाणार नाही” या भावनेतून त्यांनी देशसेवा केलेली असल्याने गावाच्या विकासासाठीही ते तितक्याच निष्ठेने कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
माजी सैनिकांनी भारतमातेच्या सेवेसाठी तळहातावर शीर घेऊन कार्य केले आहे. त्यांच्यातील देशनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त यामुळे ग्रामपंचायतीतील गैरकारभारावर आळा बसेल व प्रशासन अधिक पारदर्शक होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या निर्णयामुळे माजी सैनिकांचा सन्मान राखला जाईल, असेही मत व्यक्त करण्यात आले. या वेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, भास्कर कुठे, रविंद्र काकडे, अमर सुसर, भीमराव सवडे, साहेबराव भंडारे, अमोल ढोरे, राकेश चोपडा, अनिल सवडे, नामदेव सुरडकर, विद्यासागर डोंगर