-साखरखेर्डा नगरीतून भव्य रथोत्सव मिरवणूक
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील प.पू. श्री प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता आज १८ फेब्रुवारी रोजी भव्य रथोत्सव मिरवणूक व महाप्रसाद वितरणाने उत्साहात करण्यात आली.
सकाळी संस्थानमधून रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला. गुजरी चौक मार्गे श्रीराम मंदिर तसेच श्रींच्या निवासस्थानी मिरवणूक पोहोचली आणि तेथून पुन्हा मंदिरात परतली. संपूर्ण साखरखेर्डा नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली होती. महिलांनी पहाटेच सडामार्जन करून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी महिला व पुरुष भक्तांनी भावपूर्ण पूजा करून दर्शनाचा लाभ घेतला. मिरवणुकीत शेकडो भजनी दिंड्यांचा सहभाग होता. श्रीरामाच्या जयघोषात आणि पावली खेळत महिलांनी मिरवणुकीत विशेष रंगत आणली. ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल यांनी चहा-पाण्याची व्यवस्था केली होती, तर पालखी मिरवणूक सोहळ्यात संस्थानचे उपाध्यक्ष उल्हास देशपांडे यांनी खांदेकरी म्हणून सेवा बजावली. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी रामदास पंत आचार्य यांनी श्रींच्या जीवनचरित्रावर प्रवचन सेवा समर्पित केली. त्यानंतर प.पू. श्री प्रल्हाद महाराज यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा गुलाल उधळीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते.
आठ दिवस चाललेल्या दासनवमी महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनकार पंकज किंबहुने, वसू भारद्वाज, रामदास पंत आचार्य, मुकुंदराव मुळे यांनी प्रवचन सेवा दिली, तर कीर्तनकार संदीप बुवा मांडके, स.भ. व्यास अंबिकाताई लिंबेकर, प्रणव बुवा जोशी यांनी कीर्तन सेवा सादर केली. तसेच गायन सेवेत भूषण महाजन, घननिळ पाटील, आत्माराम दुतोंडे, श्रीपाद निंबेकर, कृष्णेंद्र वाडीकर, नागेश अडगावकर यांनी सहभाग नोंदवला. आठ दिवसांच्या या धार्मिक सोहळ्याची सांगता भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.