-१ कोटी ९१ लाख रुपये थकीत; ५५ ग्राहकांची वीज तोडणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा वीज वितरण उपकार्यालयांतर्गत तब्बल १ कोटी ९१ लाख रुपयांची थकीत वीजबिले असल्याने वीज वितरण कंपनीने धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आज १८ फेब्रुवारी रोजी गावातील ५५ थकीत ग्राहकांची वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांनी थकीत वीजबिले न भरल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कनिष्ठ अभियंता रोहीत पाटील व विलास सवडदकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गावातील थकीत वीज ग्राहकांवर कारवाई सुरू केली. याचबरोबर अवैध वीजजोडणी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची वीज तोडण्यात आली तसेच संबंधित वायर जप्त करण्यात आल्या आहेत. अशा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आजच्या कारवाईत ५५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून थकबाकीपोटी २ लाख ५० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. थकीत ग्राहकांनी तातडीने आपली बिले भरून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कनिष्ठ अभियंता रोहीत पाटील यांनी केले आहे. ही विशेष वसुली मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेत प्रशांत रिंढे, प्रशांत हिवाळे, विष्णू भोसले, रवी शेजूळ, शिवाजी जाधव, अरुण जैवळ यांच्यासह सुमारे २५ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान, दिवसभर सुरू असलेल्या कारवाईमुळे गावातील वीजपुरवठा काही प्रमाणात प्रभावित झाला होता.